मनसेचा ’राज’कीय सर्जिकल स्ट्राईक; निवडणुकीसाठी मनसैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश

Foto
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्यातरी तटस्थ असल्याचे दिसते. मात्र, निवडणुकांची घोषणा होताच ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी मनसे सज्ज झाली असून, 9 मार्च रोजी ‘राजकीय सर्जिकल स्ट्राईक’ होणार असल्याचे पोस्टर्स मुंबईत झळकत आहेत. मनसैनिकांनी या ‘सर्जिकल स्ट्राईक’साठी तयार राहावे, असे या पोस्टर्समधून सांगण्यात आले आहे.

9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिनही साजरा करण्यात येणार आहे.त्यामुळे मनसेचा ’राज’कीय सर्जिकल स्ट्राईक काय असेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसेला महाआघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसचा विरोध असून, राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी मनसेला महाआघाडीत स्थान नसल्याचे सांगितले होते;पण काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी महाआघाडीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेची महाआघाडीत एंट्री होईल, असे अनेकांना वाटत आहे. 
 वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. त्यामुळे राज ठाकरेंना ‘मनसे’ जवळ करून काँग्रेस-राष्ट्रवादी मतांची विभागणी टाळण्याचा प्रयत्न करेल, असे दिसत आहे. त्यातच मनसैनिकांकडून मुंबईतील अनेक भागांत लावण्यात आलेले पोस्टर्स काही वेगळेच संकेत  देत आहेत. 

9 मार्च रोजी ’राज’कीय सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहा, असे या पोस्टर्सवर लिहिले आहे. वर्धापनदिनी 9 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमात राज ठाकरे नक्की काय बोलतील, आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार की  महाआघाडीत सामील होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker